धाराशिवः आपल्या विविध मागण्यांसाठी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आज, शनिवारी, रौद्र रूप धारण केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या काही उपोषणकर्त्यांनी थेट झाडावर चढून आंदोलन सुरू केल्याने खळबळ उडाली. दुसरीकडे, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेला शासकीय कार्यक्रम आंदोलक महिलांनी उधळून लावत आमदार राणा पाटील यांना धारेवर धरले.
शेतकरी नेते अमोल जाधव आणि राणीताई बारकुल यांच्या नेतृत्वाखाली इतर काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज, शनिवारी, काही आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडांवर चढून आंदोलन सुरू केले. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

एकीकडे हे नाट्य सुरू असतानाच, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि आमदार राणा पाटील यांच्या उपस्थितीत अनुकंपा तत्त्वावरील शासकीय नोकरी नियुक्तीपत्रे वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. बाहेर सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती मिळताच, काही संतप्त उपोषणकर्त्या महिलांनी थेट सभागृहात प्रवेश केला.
“बाहेर आमचा शेतकरी जीव देण्यासाठी झाडावर चढला आहे आणि तुम्ही येथे पुष्पगुच्छ स्वीकारत बसला आहात का?” असा संतप्त सवाल करत या महिलांनी आमदार राणा पाटील यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला आणि अखेर कार्यक्रम उधळला गेला.
यानंतर, आमदार राणा पाटील सभागृहाबाहेर आले असता, आंदोलक महिलांनी त्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून त्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करत महिलांनी आमदारांना धारेवर धरले. या सर्व प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.