एनडीए आणि इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातूनही एका तरुण तडफदार नेत्याने अर्ज भरला आहे. या अर्जामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सहजपूर गावचा तरुण उमेश म्हेत्रे याने भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वत्र आश्चर्याचा धक्का दिला आहे. वयाने तरुण असलेल्या उमेशने नवी दिल्लीतील राज्यसभेच्या दालनात निवडणूक निर्णय अधिकारी पी.सी. मोदी आणि गिरीमा जैन यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारीसाठी आवश्यक असलेले १५ हजार रुपयांचे डिपॉझिटही त्याने जमा केले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्याने ही धाडसी पायरी उचलली, ज्यामुळे राजकीय आणि स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे

उमेश म्हेत्रे यांनी उपराष्ट्रपतीपदा सारख्या देशातील दुसऱ्या सर्वोच्च संवैधानिक पदासाठी अर्ज दाखल करून सामान्य तरुणांमधील आत्मविश्वास आणि ध्येयवादी वृत्तीचे दर्शन घडवले आहे. भारतीय संविधानानुसार, उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराला किमान ३५ वर्षे वय आणि २० प्रस्तावक तसेच २० अनुमोदकांचा पाठिंबा आवश्यक आहे. उमेशने या सर्व अटींची पूर्तता केली असल्याचा दावा केला आहे. त्याच्या या निर्णयामुळे दौंड तालुक्यातील नागरिकांमध्ये अभिमानासोबतच आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अशा उच्च पदासाठी ग्रामीण भागातील तरुणाने पाऊल उचलणे ही दुर्मीळ बाब आहे. उमेशच्या उमेदवारीमुळे सहजपूर गाव आणि दौंड तालुका राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आले आहेत. आता निवडणूक आयोगाकडून उमेशच्या अर्जाची छाननी होईल, आणि त्याची उमेदवारी वैध ठरल्यास तो निवडणुकीत काय प्रभाव पाडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. उमेशच्या या धाडसी पावलाने लोकशाहीतील सहभागाचे नवे उदाहरण घालून दिले आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. येत्या 9 सप्टेंबरला या निवडणूकीचं मतदान पार पडणार आहे. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे.