कोल्हापूर: कोल्हापूरच्या सिद्धार्थ नगर कमानीजवळ शुक्रवारी रात्री दंगल उसळली. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापनदिनाच्या फलक व साऊंड सिस्टमवरून वाद झाला होता. त्यातूनच दोन गटांमध्ये दगडफेक व जाळपोळ झाली.

सिद्धार्थ नगर : कोल्हापुरातील सिद्धार्थ नगर परिसरात असणाऱ्या चौकातील कमानी जवळ शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी आणि दगडफेकीची घटना घडली आहे. सिद्धार्थ नगर कमानीजवळ असणाऱ्या चौकात सिद्धार्थ नगर आणि राजेबागस्वार येथील दोन गटांमध्ये अनेक दिवस वाद आहे. राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या 31 व्या वर्धापनदिना निमित्त फलक आणि साऊंड सिस्टिम लावण्यात आले होते. यावरून दुपारपासूनच तणाव निर्माण झाला होता. तसेच या चौकात वर्चस्व कुणाचं यावर देखील अनेक वर्ष इथल्या तरुणांमध्ये वाद आहे.
शुक्रवारी सायंकाळी हा वाद उफाळून आला. दोन्ही गटातील नागरिकांनी एकमेकांवर तुंबळ दगडफेक करण्यास सुरुवात केली. यावेळी संतपलेल्या काही तरुणांनी या परिसरातल्या चार चाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. तर काहींनी वाहने पेटवून देण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कुमक मागून जमावावर नियंत्रण आणलं. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी होत असल्याने हा वाद अधिक तीव्र होऊ नये यासाठी पोलिसांनी दोन्ही जमावला पांगवलं. तर काहींना ताब्यातही घेतलं आहे. हा नेमका वाद कशावरून झाला याबद्दल पोलिसांनी अधिकृतरित्या माहिती दिली नाही. ज्या बॅनर वरून हा वाद उफाळून आला ते बॅनर पोलिसांनी उतरवले आहेत. सध्या सिद्धार्थ नगर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली आहे.