मनोज जरांगे पाटील दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज झालेत. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं.
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केलीय. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबामध्ये घेतलेल्या सभेत जरांगे पाटलांनी, पोलिसांना सत्तेत बदल होत असतो, असा इशारा दिला. आम्ही मुंबईत येतोय, काय करायचं ते करा असं थेट आव्हान जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय.

मनोज जरांगे पाटील दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्यासाठी सिद्ध झालेत. सरपंचापासून सगळ्या नेत्यांना मुंबईला यायला सांगा, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं.
पोलीस अधिकाऱ्याला काही करायचं असेल तर महादेव मुंडेच्या मारेकऱ्यांना शोधा, असा टोला जरांगे पाटलांनी लगावला. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो असंही जरांगे पाटील म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या काय मागण्या आहेत?
हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करा.
मराठा आणि कुणबी एकच आहेत. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या.
सगेसोयरेची अंमलबजावणी करा.
शिंदे समितीचं नोंदी शोधायचं काम पुन्हा सुरु करा आणि मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्या
मराठा आरक्षणासाठी जरांगे
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांनी आतापर्यंत किती आंदोलनं केली?
14 सप्टेंबर 2023 रोजी जरांगे पाटलांनी 40 दिवसांची मुदत दिली होती. जरांगेंनी दिलेली पहिली डेडलाईन 24 ऑक्टोबर 2023 रोजी संपली होती. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. परिणामी मनोज जरांगे पाटलांनी 24 डिसेंबर 2023ची नवी डेडलाईन दिली. मात्र तोडगा निघाला नसल्यामुळे जरांगे पाटलांनी 20 जानेवारी 2024 रोजी मुंबईकडे कूच केली. 27 जानेवारी 2024 रोजी मराठा आरक्षणाचा अध्यादेश जारी करण्यात आला होता. सरसकट कुणबी प्रमाणपत्र, सगेसोयरे अंमलबजावणीसाठी जरांगे आग्रही होते. त्यामुळे 2024च्या जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात पुन्हा उपोषण सुरू करण्यात आलं. राज्य सरकारनं एक महिन्याची मुदत मागून घेतली होती. त्यानंतर 20 जुलै 2024 पासून पुन्हा उपोषणाला सुरूवात झाली.24 जुलै 2024 रोजी उपोषण मागे घेण्यात आलं. 13 ऑगस्ट 2024 पर्यंत सरकारला डेडलाईन देण्यात आली. 17 सप्टेंबर 2024 पासून सहाव्यांदा उपोषणाला सुरूवात झाली. 25 जानेवारी 2025 पासून सातव्यांदा उपोषण सुरू करण्यात आलं. आणि आता 27 ऑगस्ट 2025 रोजी पुन्हा मुंबईकडे कूच केली जाणार आहे.
यावेळी तरी जरांगे पाटलांचं आंदोलन यशस्वी होतं की नाही, याकडे राज्याचं लक्ष लागलंय.