टि्वट वॉर रंगले: भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात टि्वट वॉर रंगले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रोहित पवारांनी केलेल्या आरोपाला बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत पुरावे द्या, अन्यथा राजकीय संन्यास घ्या, असे आवाहन केले होते. ते आव्हान स्वीकारत रोहित पवारांनी थेट पुरावाच दिला आहे.

रोहीत पवार : “मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही…हा घ्या पुरावा …” असे म्हणत भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिलेल्या उत्तराचा दाखला थेट सोशल मीडियावर शेअर करीत बावनकुळेंची कोंडी केली आहे. ‘आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या..आहे का हिंमत? असे सांगत रोहित पवारांनी बावनकुळेसमोर दंड थोपटले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘देवाभाऊ’या जाहीरातीवरुन रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन बावनकुळे आणि भाजपला लक्ष्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देत बावनकुळे यांनी पवारांकडे पुरावा मागितला होता. तो पुरावा रोहित पवारांनी दिला आहे.
देवाभाऊ’ असा उल्लेख असेली जाहिरात सध्या वर्तमान पत्रात आणि टिव्हीवर झळकत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी फुलं अर्पण करत असल्याचं फडणवीस या जाहिरातीत दिसतात. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणाही ऐकू येतात, ही जाहिरात नेमकी कुणी दिली? हे अद्याप गुलदस्तातच आहे.
भाजपवर टीका करतानाच रोहित पवार यांनीही “महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का?” असा प्रश्न मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केला. यावर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर देत रोहित पवारांनी फारच मोठा शोध लावल्याचे म्हटले आहे. याबाबत बावनकुळेंनी यांनी टि्वट करीत रोहित पवारांवर टोला लगावला आहे.

रोहित पवार म्हणतात…
आदरणीय बावनकुळे साहेब,
मी कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही…
हा घ्या पुरावा …
तुमच्याच पक्षाचे आमदार मा.बबनराव लोणीकर यांनी 11 जुलै 2025 रोजी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला तुम्ही स्वतः महसूल मंत्री म्हणून उत्तर दिले आहे….
दिलेले उत्तर आणि प्रश्न तुम्हीच बघा, तुम्ही केवळ दंडच माफ केला नाही तर जप्त केलेले साहित्यदेखील परत करण्याचे आदेश दिले होते हे विसरलात का?
एकंदरीतच यावरून असे दिसून येते की, गावातील लोक जेव्हा पाणंद रस्ते किंवा गावातील रस्ते यासाठी मुरूम काढतात तेंव्हा तुम्ही त्यांच्यावर कारवाई करता पण दुसरीकडे धनदांडग्यांनी अवैध उत्खनन केलं असतानाही कोट्यवधींचा दंड माफ करता…
हेच का तुमचं सर्वसामान्यांचं सरकार?
राहिला प्रश्न राजकीय संन्यासाचा तर आम्ही तुम्हाला राजकीय संन्यास घ्या म्हणत नाही फक्त जनतेच्या प्रश्नाचे उत्तर द्या..
आहे का हिंमत?