मावळ :- पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील राजकारण आता खालच्या स्तरावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. आंबेगाव-शिंदगावचे माजी सरपंच आणि कुसगाव-काले गटातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अशोक राजिवडे यांच्यावर सोमवार दि. ०३ या दिवशी पवनानगर-कामशेत रोडला बऊर फाट्यावर जादूटोणा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर राजिवडे यांच्यावर झालेल्या या अघोरी प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राजकीय द्वेषातून अघोरी प्रकार
अशोक राजिवडे हे कुसगाव-काले जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ इच्छुक दावेदार होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून दुसऱ्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केले. उमेदवारी न मिळाल्याने आधीच समर्थकांमध्ये नाराजी असताना, आता थेट त्यांच्यावर अघोरी कृत्ये करून त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर राजिवडे यांचा फोटो आणि त्यावर लिंबू-कुंकू टाकून करण्यात आलेला हा प्रकार सोमवारी नागरिकांच्या नजरेस पडला.

कोणाचे धाबे दणाणले?
पक्षाने उमेदवारी नाकारली असली, तरी राजिवडे यांचा भागातील जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळेच त्यांना राजकीय स्पर्धेतून बाजूला करण्यासाठी किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला गेल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. “उमेदवारी नाकारणे हा पक्षांतर्गत भाग असला तरी, अशा प्रकारे अघोरी विद्येचा वापर करून कुणाचे तरी वाईट चिंतणे हे मावळच्या संस्कृतीला धरून नाही,” अशी प्रतिक्रिया राजिवडे यांच्या समर्थकांनी दिली आहे.
तपास करण्याची मागणी
अद्याप हे कृत्य कोणी केले, याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. मात्र, सोशल मीडियावर या घटनेचे फोटो व्हायरल झाल्यानंतर समर्थकांनी संताप व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या काळात वैचारिक लढाई होण्याऐवजी अशा प्रकारच्या कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींना समोर आणावे, अशी मागणी जोर धरत आहे.