अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार हे राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशी शक्यता आहे. पार्थ पवारांना शरद पवार यांचा पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
•अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी नेतृत्वाबाबत निर्णय
•पार्थ पवार राष्ट्रवादीचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता
•शरद पवार यांचा पार्थ पवार यांच्या नावाला पाठिंबा.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे अध्यक्ष कोण होणार या प्रश्नाचे उत्तर मिळालंय. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्षपदाची जबाबदारी पार्थ पवार यांच्याकडे देण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयाला शरद पवार यांचाही पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दरम्यान विमान अपघातात अजित पवार यांच्या मृत्यू झाल्यानंतर पक्षाचे अध्यक्षपद कोणाकडे जाणार असल्याची चर्चा रंगली होती. राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी पक्षाचे नवे अध्यक्ष होतील अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू होती.
मात्र खुद्द पटेल यांनी या चर्चाना फेटाळून लावल्या आणि अध्यक्ष कोण होणार याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार घेतील असे ते म्हणाले होते. दरम्यान आता पार्थ पवार यांना अध्यक्षपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. शरद पवारांकडूनही पार्थ पवार यांच्या नावाला पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. याबाबत बारामतीमधील विद्या प्रतिष्ठाण येथे दोन बैठका झाल्या आहेत. अजित पवार यांच्या स्मारकासंदर्भात झालेल्या बैठकीत पार्थ पवार उपस्थित होते, त्यावेळी शरद पवार त्यांना सर्व माहिती देत होते.